चाकूर सलीम तांबोळी

-शिवणखेडहून नळेगाव येथे मोटार सायकलवरून लग्नाला निघालेल्या पती- पत्नीचा नांदगाव पाटीजवळ अपघात झाला. या अपघातात पतीचा मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली. विश्वनाथ केशव काटे (वय ५०, रा. शिवणखेड, ता. चाकूर) असे मृताचे तर सुनंदा विश्वनाथ काटे (वय ४५) असे जखमी महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि.१२) सकाळी ११ च्या सुमारास घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, शिवणखेड येथील दाम्पत्य मोटारसायकलवरून (एम एच २४ आर १८६२) नळेगाव येथे पाहुण्याच्या लग्न सोहळ्यास आज सकाळी जात होते. यावेळी नांदगाव पाटीजवळ कारने (एम एच ४३ डी ९०३५) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात विश्वनाथ काटे गंभीर जखमी झाले. त्यांचा लातूर येथे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी सुनंदा काटे गंभीर जखमी झाल्या असून त्यांचा पाय फॅक्चर झाला आहे.मृत विश्वनाथ काटे हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा काटे, ४ मुली, १ मुलगा असा परिवार आहे.
