चाकूर प्रतिनिधी :
तहसील कार्यालयाच्या वतीने बोथी येथील हनुमान मंदिरात मंगळवारी (ता. 15) छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात 113 नागरिकांना विविध प्रकारचे दाखले व सेवा प्रदान करण्यात आल्या त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महसूल विभागाच्या वतीने शेतकरी, विद्यार्थी व महिला यांच्या दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी तसेच महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन केले जात आहे. नायब तहसीलदार दिगंबर स्वामी यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. मंडळ अधिकारी निळकंठ केंद्रे, ग्राम महसूल अधिकारी संदीप नादरगे, डी. डी. तेली, तसेच तहसीलचे अन्य कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, रहिवाशी, उत्पन्नाचे तसेच अधिवास प्रमाणपत्र तसेच शिधापत्रिकेचे केवायसी, सातबाराचे वितरण, मतदान ओळखपत्राचे वाटप, लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्डचे वाटप ऍग्रीस्टॅकची नोंदणी या योजनांचा 113 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
